आरोग्य सेनेच्या पथकाची केरळ पूरग्रस्तांना बोटींनी जाऊन मदत

८ खेड्यांमधील ११०० रुग्णांवर उपचार, १० हजार लोकांना लेप्टोस्पायरा प्रतिबंधक औषधे

आरोग्य सेना ही राष्ट्रीय संघटना गेली २४ वर्षे देशात फार मोठ्या प्रमाणावर आपत्ती कालीन वैद्यकीय मदत कार्य करीत आहे. आपल्या देशात आरोग्य सेनेने सर्वप्रथम आपत्ती व्यवस्थापनाला जनचळवळीचे स्वरूप दिले. केरळ पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आरोग्य सेनेचे २१ सदस्यांचे पथक आरोग्य सेनेचे संस्थापक राष्ट्रीय प्रमुख आणि देशातील आपत्ती व्यवस्थापनाचे जनक डॉ. अभिजित वैद्य यांच्या नेतृत्वाखाली ३१ ऑगस्ट २०१८ रोजी पोहोचले. या पथकात महाराष्ट्रातील १५ आणि तामिळनाडू राज्यातील ६ सदस्य होते. या सदस्यांची नावे पुढील प्रमाणे: डॉ. अभिजित वैद्य (हृदयरोगतज्ज्ञ), डॉ. नितीन केतकर, डॉ. पंडित बोबडे, डॉ. सुहास कुलकर्णी (करमाळा), डॉ. गौरव केतकर (दंतरोगतज्ज्ञ), स्वप्निल वैद्य (मानसतज्ज्ञ), लक्ष्मीकांत मुंदडा, आशिष आजगांवकर, प्रा. प्रमोद दळवी, वर्षा गुप्ते, अतुल रुणवाल (दिघी), रमाकांत सोनवणी, आनंद चव्हाण (टेंभूर्णी), अॅड. केतन जाधव (टेंभूर्णी), अस्मा तांबोळी, तामिळनाडू शाखेचे प्रमुख डॉ. रविचन्दिरन, पी. गणपथी, एम.पी. मणीवन्नन, रघुकुमार चंद्रसेकर, विग्नेश्वरन, कार्थिकेयन.

या पथकाबरोबर ३० प्रकारची पुरानंतर उद्भवणाऱ्या आजारांवरील, हृदयरोग, मधुमेह, उच्चरक्तदाब, दमा, संधिवात इ. दीर्घकालीन आजारांवरील, तसेच लेप्टोस्पायराच्या प्रतिबंधावरील आणि रॅट बाईट फिवर वरील एकूण ४ लाख रुपये किंमतीची उच्च दर्जाची औषधे होती. केरळ सरकारने राज्याबाहेरील वैद्यकीय पथकांना येण्यास बंदी घातलेली असूनही आरोग्य सेनेचा या क्षेत्रातील प्रचंड अनुभव लक्षात घेवून या पथकास काम करण्याची विशेष परवानगी देण्यात आली. यासाठी डॉ.रविचंदीरन यांच्या मार्फत डॉ. अभिजित वैद्य यांची केरळ उच्च न्यायालयाचे जॉइंट रजिस्ट्रार श्री. डी. जी. सुरेश यांची भेट घडविण्यात आली. त्यांनी रजिस्ट्रार श्री. साबू यांच्याशी चर्चा करून जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि विविध पंचायतींचे अध्यक्ष, सचिव यांच्याशी संपर्क साधून आरोग्य सेनेच्या पथकाच्या वैद्यकीय शिबिरांचे नियोजन करण्यास सांगितले. अलेप्पी जिल्हाधिकारी श्री. नूह यांनी डॉ. अभिजित वैद्य यांच्याशी संपर्क साधून नियोजनाची कल्पना दिली. श्री. साबू आणि श्री. सुरेश हे स्वत: पंचायत पदाधिकाऱ्यांसह २ सप्टेंबर रोजी वैद्यकीय शिबिरास जातीने उपस्थित राहिले, व त्यांनी टेबले उचलण्यापासून मदत केली. राज्य पातळीवरील इतक्या उच्च पातळीवरील अधिकाऱ्यांचा असा सहभाग गेल्या २४ वर्षांमध्ये आरोग्य सैनिक प्रथमच अनुभवत होते. या दोनही अधिकाऱ्यांनी अशी अनेक शिबिरे आयोजित केली होती आणि प्रत्यक्ष घरांमधील चिखल उपसण्याचे कामही केले असल्याचे कळले. केरळ उच्च न्यायालयाच्या कर्मचारी संघटनेची सेवाभावी संघटना ‘समन्वय’ चे कार्यकर्ते पथकाच्या सतत बरोबर राहिले. बाकी प्रशासकीय यंत्रणाही याच पद्धतीने काम करीत होती. आरोग्य सेनेच्या संपूर्ण मदत कार्याचे तंतोतंत कार्यक्षम नियोजन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केले. इतकेच नाही तर पाण्याने वेढलेल्या बेटांवर रहाणाऱ्या लोकांना तपासण्यासाठी बोटही उपलब्ध करून दिली. आरोग्य सेनेचे पथक त्यामुळे बॅक वॉटर आणि लेकस मधील अनेक गावांमध्ये पोहोचू शकले.
आरोग्य सेनेच्या पथकाने वरपुरा जिल्ह्यातील केरीगाव (वरपुरा), चेरीयापल्लमथूरुटू (उत्तर परवर), मन्नामथुरूटू (वरपुरा), अझीयीडाथुचीरा (चाथेन्केरी ब्लॉक, पथनमठीत्ता जिल्हा), ओथर (कुतूर पंचायत, पथनमठीत्ता जिल्हा), कुप्प्पुराम, कैनाकेरी गाव (पझूर वॉर्ड), कैनाकेरी वडक (कुत्तमंगलम), अशा ८ ठिकाणी वैद्यकीय शिबिरे घेवून सुमारे ११०० रुग्णांवर उपचार केले. या सर्व रुग्णांना त्यांच्या आजाराला लागणारा औषधांचा पूर्ण डोस देण्यात आला. दीर्घकालीन आजार असणाऱ्या रुग्णांना किमान एक महिन्याची सर्व औषधे देण्यात आली. आरोग्य सेनेच्या धोरणा नुसार सुटी औषधे दिली जात नाहीत तर स्ट्रिप दिल्या जातात, तसेच पातळ औषधाची पूर्ण बाटली वा मलमाची पूर्ण ट्यूब दिली जाते. या सर्व गावांमधील १० हजार रुग्णांना लेप्टोस्पायरा प्रतिबंधक ‘डॉक्झीसायक्लीन’ च्या कॅप्शुलस व ‘ओआरएस’ ची पाकिटे देण्यात आली. या सर्व रुग्णांना पुरात हमखास होणाऱ्या पायाच्या फंगल संसर्गासाठी मलमे देण्यात आली. ४०० रुग्णांना बँडेजेस व प्रतिजैविक मलमे, सर्व गरोदर स्त्रियांना ‘लोह’ व ‘ब’ जीवनसत्वाच्या गोळ्या, सर्व लहान बालके व वृद्धांना ‘ब’ जीवनसत्वाच्या गोळ्या देण्यात आल्या. २५० रुग्णांची रक्तशर्करा तपासण्यात आली. मधुमेही रुग्णांची औषधे वाहून गेल्याने ४०० – ५०० मिग्रॅ वर साखरेची पातळी गेलेले अनेक रुग्ण सापडले त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. सर्व प्रौढांचा रक्तदाब तपासण्यात आला. अनेक रुग्णांची रक्तदाब पातळी वाढलेली सापडली त्यांचावर उपचार करण्यात आले. हृदयरोगाच्या रुग्णांना आवश्यक ती सर्व औषधे देण्यात आली. केरळ मध्ये हृदयरोग, उच्चरक्तदाब, कोलेस्टेरोल, मधुमेह, थायरॉईडच्या आजारांचे प्रचंड प्रमाण सापडले.
आरोग्य सेनेच्या या पथकाच्या तयारीचे काम कमलेश हजारे, वरदेंद्र कट्टी, शरद बेनुस्कर, हनुमंत बहिरट, रश्मी वैद्य, संतोष म्हस्के, राजश्री दळवी, मनिषा वैद्य, संध्या बहिरट, मनोहर भंडारी, सुनिल वैद्य, ज्योती मोरे, अश्विनी ठोंबरे, स्मिता गरुड यांनी केले.
केरळवर कोसळलेली ही आपत्ती न भुतोनभविष्यती अशी आहे. या आपत्तीचा सामना केरळ मधील जनतेने ज्या धैर्याने केला आणि करत आहे त्याला तोड नाही. केरळ प्रशासनाची एकूणच तत्परता आणि कार्यक्षमता अपवादात्मक होती. तरीही हे आव्हान फार मोठे आहे आणि यातून पूर्ववत होण्यासाठी किमान १-२ वर्षे लागतील. पर्यटन हा केरळचा मोठा आर्थिक आधार आहे. तो या आपत्तीमुळे पूर्ण कोलमडलेला आहे. यासाठी केरळला किमान ३० हजार कोटी रुपयांची गरज आहे. केंद्र सरकारने केरळ सरकारबद्दल दाखविलेला सापत्नभाव खेदजनक आहे. नेपाळला ३ हजार कोटी रुपये पाठविणाऱ्या आणि बुलेट ट्रेनवर लाखो कोटी रुपये खर्च करणाऱ्या केंद्राने केरळला फक्त ५०० कोटी रुपयांची मदत दिली आहे. परकीय मदत घेण्यावर बंदी घालण्यात आली. परकीय मदत घेणे हे स्वाभिमानाला धक्का लावणारे आहे असा युक्तिवाद करण्यात आला. या पूर्वी शेकडो कोटी रुपयांची परकीय मदत अगदी गुजरात भूकंपाच्या वेळीही स्वीकारण्यात आली या बाबीकडे डोळेझाक करण्यात आली. गोमांस खाण्याची ही शिक्षा आहे अशी क्रूर, धर्मांध आणि अंधश्रद्धाळू थट्टाही करण्यात आली. अशीच आपत्ती केदारनाथ आणि उत्तरकाशी देवस्थानांवर कोसळली होती याचा सोयीस्कर विसर या लोकांना पडला. देशाच्या कोणत्याही भागावर आपत्ती कोसळल्यावर सर्व भेदांच्या पलीकडे जाऊन तेथील जनतेच्या मागे उभे रहाणे गरजेचे आहे असे आरोग्य सेनेने कायम मानले आणि ते कृतीत आणले. यातूनच भारतीयत्वाचा भक्कम धागा विणला जाईल. हीच खरी देशभक्ती. ही एका प्रकारे राष्ट्र उभारणीही आहे. आरोग्य सेनेने अशा देशकार्यातील आपला वाटा गेली २४ वर्षे सातत्याने नेहमीच उचलला आहे. आरोग्य सेना सरकारकडून किंवा आंतरराष्ट्रीय स्त्रोतांकडून आर्थिक मदत घेत नाही. आरोग्य सेनेच्या या मोहिमेसाठी असंख्य हितचिंतकांनी प्रत्यक्ष आर्थिक रुपात आणि अनेकांनी औषध रुपात उदारहस्ते मदत केली. अधिक मदत मिळाल्यास आरोग्य सेना या मदत कार्याचा पुढील टप्पा आखण्यास सज्ज आहे.

Share This Post