पुरोगामी जनगर्जना हे चळवळीचे हत्यार – प्रा. शरद जावडेकर
“आरोग्य सेनेचे मासिक पुरोगामी जनगर्जना हे वैचारिकता जपत समाजातील अन्याय आणि कुरूपतेवर प्रहार करते वैचारिक संघर्ष करणारी मराठी मासिकांची परंपरा नाहीशी होत असताना पुरोगामी जनगर्जना चळवळीचे हत्यार बनत ही उणीव भरून काढीत आहे. या मासिकाने विषयांचे वैविध्य जपून क्लिष्टतेला फाटा देत विश्लेषण करण्याचा पायंडा पाडला आहे. येणाऱ्या अंधाऱ्या काळात प्रकाशाची पणती जपून ठेवण्याचे काम हे मासिक करीत आहे.” असे उद्गार अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेचे प्रा शरद जावडेकर यांनी काढले.
पुरोगामी जनगर्जनाच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. हे प्रकाशन त्यांच्या हस्ते आरोग्य सेनेच्या राष्ट्रीय मुख्यालयात 22 नोव्हेंबर 2019, मंगळवार रोजी पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरोग्य सेनेचे राष्ट्रीय प्रमुख डॉ अभिजित वैद्य होते. ते आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, “ई व्ही एम जिंकणार का लोकशाही हा प्रश्न देशापुढे आहे. जनतेला भावनिक मुद्यांवर गुंतवून देशाची आर्थिक लूट करण्याचे काम हे सरकार करीत आहे. उद्योगपतींना पावणेतीन लाख कोटी रुपयांची सूट देण्यात आली आहे. बेकारी वाढत आहे. शेतकरी आणि आता व्यापारीही आत्महत्या करीत आहे. आणि सरकार पाकिस्तान आणि 370 च्या मागे लपून निवडणुका जिंकत आहे. जनतेला रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय नाही. जनतेला ही प्रेरणा देण्याचे काम पुरोगामी जनगर्जनेने करावे”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सम्राट यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ नितीन केतकर यांनी केले. जनगर्जनाच्या अनेक लेखकांनीही आपली मनोगते मांडली.
या प्रसंगी आरोग्य सेनेचे डॉ गीतांजली वैद्य, वर्षा गुप्ते, प्रमोद दळवी, संतोष म्हस्के, राजश्री दळवी, मनीषा वैद्य, हनुमंत बहिरट, संध्या बहिरट, वायरचे नितीन ब्रम्हे, प्रा. वंदना पलसाने, नीलिमा गावडे, लक्ष्मी यादव, अध्यापक सभेचे रामचंद्र जाधव आदी उपस्थित होते.